अपात्र शिक्षकांचे वेतन काढल्याचा आरोप; मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर : प्रतिनिधी

खळेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व स्व. भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक रमेश कंकाळ यांनी अपात्र शिक्षकांचे वेतन काढून शासनाच्या तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात तक्रारदार सूर्यकांत हिम्मतराव पवार यांनी शिक्षण विभागाकडे निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, २२ मे २०२५ रोजीच्या सेवा ज्येष्ठता यादीनुसार इयत्ता ९ वी ते १० वी साठी तीन पदवीधर शिक्षक मंजूर कार्यरत आहेत. मात्र इयत्ता ६ वी ते ८ वी साठी संच मान्यता २०२५-२६ नुसार दोन पदवीधर शिक्षक मंजूर असताना प्रत्यक्षात एकच शिक्षक पदवीधर पात्र ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे संच मान्यतेनुसार दुसरे पद अपात्र ठरत असतानाही मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून मे २०२५ पासून संबंधित शिक्षकांचे वेतन काढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी करून अवैधरीत्या काढण्यात आलेल्या वेतनाची दंडात्मक वसुली करावी तसेच शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सूर्यकांत पवार यांनी केली आहे.

दरम्यान, यापूर्वी वारंवार तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासण्याची मागणी होत आहे.

या आरोपांबाबत संबंधित मुख्याध्यापक व शिक्षण विभागाची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *