उमाळी शिवारात स्था.गु.शा.ची धडक कारवाई
अवैध देशी दारू वाहतूक करणारा आरोपी जेरबंद; ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
मलकापूर : जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक केली आहे. या कारवाईत देशी दारूचे १० बॉक्स, एक मोटारसायकल असा एकूण ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध व विनापरवाना देशी-विदेशी दारू बाळगणे, वाहतूक करणे व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार आशिष रोही यांनी विशेष पथके तयार करून कारवाया सुरू केल्या होत्या.
दि. ९ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम मोटारसायकलवर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने उमाळी शिवारात नाकाबंदी केली. दरम्यान संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता आरोपी मोहन नयनसिंग जाधव (वय ३७, रा. गिरणी ता. मलकापूर) हा मोटारसायकलवर देशी दारू वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ४३ हजार २०० रुपयांचे देशी दारूचे १० बॉक्स तसेच ५० हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि प्रताप बाजड, पोहेकॉ. गजानन दराडे, जगदेव टेकाळे, दिनेश बकाले, युवराज राठोड, मपोकॉ. पूजा साळवे, कोमल इंगळे व पोकॉ. मनोज खरडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
