**“गावकऱ्यांना पाणी नाही, निधी कुठे गेला?”** **सारंगपूर ग्रामपंचायतीविरोधात गजानन बोरकरांचा एल्गार; चौकशीची मागणी**

KHOZ MASTER
2 Min Read

**“गावकऱ्यांना पाणी नाही, निधी कुठे गेला?”**
**सारंगपूर ग्रामपंचायतीविरोधात गजानन बोरकरांचा एल्गार; चौकशीची मागणी**

**मेहकर : प्रतिनिधी**

मेहकर तालुक्यातील सारंगपूर-जयताळा गट ग्रामपंचायतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असल्याचा गंभीर आरोप यशवंत सेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख गजानन माधव बोरकर यांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या विकासकामांपासून पाणीपुरवठा योजना, निधी खर्च, कर वसुली आणि शासकीय नोंदींमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे.

गजानन बोरकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सारंगपूर व जयताळा गावांसाठी पाणीपुरवठा योजनेवर लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात गावकऱ्यांना पाणी मिळत नसून नागरिकांना खाजगी पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यासाठी प्रत्येक घरातून दरमहा सुमारे २५० रुपये आकारले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी आणि नळपट्टीच्या नावाखाली नागरिकांकडून वसुली केली जाते. मात्र ही रक्कम ग्रामपंचायतीच्या अधिकृत खात्यात जमा न करता ऑपरेटर व ग्रामसेवकांकडून परस्पर वापरली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

गावात नियमित पाणीपुरवठा होत नसताना ब्लिचिंग पावडर खरेदीवर हजारो रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याचा मुद्दाही बोरकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच लॅपटॉप खरेदीसह इतर व्यवहारांमध्येही अनियमितता झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वाटप झाले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय काही ठिकाणी ठराव न घेता “८ अ” नोंदी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, माहिती अधिकारातून माहिती मागवल्यानंतर काही नोंदींमध्ये बदल करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामसेवक, ऑपरेटर आणि सरपंच यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी तसेच गावकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी गजानन बोरकर यांनी केली आहे.

दरम्यान, दि. २८ जून २०२६ पर्यंत योग्य कारवाई न झाल्यास दि. २९ जून रोजी मेहकर तालुका, बुलढाणा जिल्हा किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती महसूल आयुक्त अमरावती, पोलीस महानिरीक्षक कार्यालय अमरावती, पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांना देण्यात आल्याची माहिती आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *