घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती मोफत द्या — भाई विजयकांत गवई यांची मागणी

KHOZ MASTER
2 Min Read

घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना ५ ब्रास रेती मोफत द्या — भाई विजयकांत गवई यांची मागणी

चिखली : प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना तसेच इतर घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार ५ ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
रिपब्लिकन सेनेचे विदर्भ प्रदेश सचिव भाई विजयकांत गवई यांच्या नेतृत्वाखाली १२ जून रोजी हे निवेदन देण्यात आले. चिखली तालुक्यात विविध घरकुल योजनांचे अनेक लाभार्थी घरबांधणीचे काम करीत असून, शासनाने घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी आवश्यक ५ ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, महसूल विभागाकडून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या लोककल्याणकारी निर्णयाचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असून, चिखली तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व इतर घरकुल योजनांच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना येत्या १५ ते २० दिवसांच्या आत शासन निर्णयानुसार ५ ब्रास रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत संबंधित महसूल अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास व घरकुल लाभार्थ्यांवर अन्याय होत राहिल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने चिखली तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाई विजयकांत गवई यांनी दिला.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे बुलडाणा नेते सलीम भाई, सतीश पवार, दीपक तायडे आणि विशाल काकडे उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *