जानेफळ पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई!

KHOZ MASTER
3 Min Read

जानेफळ पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई!

मोळा–पिंप्री माळी रोडवर २७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त; मात्र गावातील अवैध विक्रीवर प्रश्नचिन्ह

मेहकर तालुक्यातील मोळा–पिंप्री माळी रोड परिसरात अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर जानेफळ पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनाच्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जानेफळ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी आरोपीकडून देशी दारूचे सिलबंद बॉक्स आढळून आले. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी स्कुटी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईत एकूण २७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.

पोलिसांच्या कारवाईचे कौतुक

अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई करत कायद्याचा धाक निर्माण करणाऱ्या जानेफळ पोलीस पथकाचे परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. “अवैध व्यवसायांना आळा बसण्यासाठी अशाच कठोर कारवाया आवश्यक आहेत,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

मात्र मोठा प्रश्न कायम…

एकीकडे मोळा येथिल दारू वाहतुकीवर कारवाई होत असताना दुसरीकडे मात्र पिंपरी माळी गावात व परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. गावातील काही भागांत रात्री उशिरापर्यंत अवैध दारू विक्री होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात असून, या विक्रीमुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असल्याची चिंता पालक व्यक्त करीत आहेत.

स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की,
“फक्त वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर गावागावात सुरू असलेल्या अवैध विक्री केंद्रांवरही धडक कारवाई होणे गरजेचे आहे.”

महिलांमध्ये संताप

अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबांमध्ये वाद वाढत असून, घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे पिंपरी माळी परिसरातील अवैध दारू अड्ड्यांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

पोलीस प्रशासनाकडून ठोस मोहिमेची अपेक्षा

जानेफळ पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद असली तरी ज्या वाईन शॉप मधुन अख्खे बॉक्स विकले जातात अशा “मोठ्या माशांपर्यंत”पोलिसांनी पोहोचणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. अवैध दारू पुरवठा साखळी, विक्रेते आणि मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई झाली तरच या व्यवसायाला खऱ्या अर्थाने आळा बसेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

सध्या परिसरात एकच चर्चा रंगली आहे —
“वाहतुकीवर कारवाई झाली आता गावा गावातील आणि विशेष म्हणजे पिंपरी माळीतील अवैध विक्रेत्यांवर पोलीस धडक कारवाई करणार का?”

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *