वाशिम
अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या विळख्यात अडकलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गंभीर आर्थिक व मानसिक तणावाचा सामना करत असल्याचे चित्र समोर आले आहे. निसर्गाचा लहरीपणा, वाढते कर्ज, उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि शेतीमालाला न मिळणारा योग्य भाव यामुळे शेतकरी हतबल झाला असून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र चिंताजनक बनले आहे.
उपलब्ध शासकीय आकडेवारीनुसार, वाशिम जिल्ह्यात यंदा ८ जूनपर्यंत तब्बल २८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मागील १७ महिन्यांत जिल्ह्यातील १५३ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्य शासनाने ५५.७२ लाख शेतकऱ्यांचे सुमारे ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचे थकीत पीककर्ज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, ही कर्जमाफी दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीककर्जापुरती मर्यादित असल्याने अनेक शेतकरी या योजनेच्या कक्षेबाहेर राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच, कर्जमाफीच्या घोषणेपूर्वीच्या केवळ पाच महिन्यांच्या कालावधीतच जिल्ह्यात २८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.
विशेष म्हणजे, यापैकी केवळ ७ आत्महत्या प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली आहेत. तर १३ प्रकरणे अपात्र घोषित करण्यात आली असून ८ प्रकरणांचा तपास आणि चौकशी अद्याप सुरू आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत मिळण्यातही अडचणी निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही प्रशासनासाठी गंभीर चिंतेची बाब बनली असून शेतीमालाला हमीभाव, सिंचन सुविधा, कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थैर्य यांसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.
