मेहकर : प्रतिनिधी
मेहकर शहरातील सर्वे क्रमांक १६/२ भाग-१ येथील शाळेसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या खुल्या जागेची कथित बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते शेख हमीद शेख अफसर बागवान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित लेआऊटमध्ये सार्वजनिक आणि शैक्षणिक वापरासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेवर प्लॉट पाडून त्याची खाजगी विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्यानुसार, मूळ जमीन मालक डॉ. एजाज अहमद खान यांनी संबंधित जागा प्रथम निसार अहमद अन्सारी यांना विक्री केली. त्यानंतर निसार अहमद अन्सारी यांनी ती जागा शेख आमीर शेख इस्माईल यांना विकल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सन २००६-०७ मध्ये संबंधित जमिनीला देण्यात आलेल्या बिगरशेती परवानगीवेळी मंजूर लेआऊटनुसार सार्वजनिक वापरासाठी खुली जागा राखीव ठेवण्यात आली होती. महाराष्ट्र जमीन महसूल नियमांनुसार लेआऊटमध्ये किमान १५ टक्के क्षेत्र खुल्या जागेसाठी राखीव ठेवणे आवश्यक असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सदर लेआऊटमध्ये ३२१४.५९ चौरस मीटर क्षेत्र सार्वजनिक वापरासाठी राखीव असल्याचा दावा करण्यात आला आहे. या परिसरात सुमारे ७० कुटुंबे वास्तव्यास असून, ही जागा लहान मुलांच्या खेळासाठी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी वापरली जात असल्याचे रहिवाशांनी सांगितले आहे.
ही जागा खाजगी मालकीत गेल्यास नागरिकांच्या सार्वजनिक हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विक्री व्यवहाराची चौकशी करावी, खरेदी-विक्री व्यवहारास तात्पुरती स्थगिती द्यावी, मंजूर लेआऊटनुसार प्रत्यक्ष पाहणी करून जागा सार्वजनिक वापरासाठी संरक्षित घोषित करावी, तसेच नियमभंग आढळल्यास संबंधित विक्रेते व खरेदीदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
