जळगाव जामोद : प्रतिनिधी
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आक्रमक आंदोलन केले. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चढून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवला.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीकविमा मिळावा, या मागणीसाठी रविकांत तुपकर हे बुलढाणा येथे गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत.
मात्र, शासनाचा कोणताही प्रतिनिधी आंदोलनस्थळी न गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शासनाने तुपकर यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि पीकविमा द्यावा, या मागणीसाठी जळगाव जामोद तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान काही शेतकरी तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर चढले होते. या प्रकरणी पोलिसांनी वैभव जाणे, सदानंद जाणे, अजय गिरी, अनिलसिंग सोळके, सोपान भालतडक, शिवदास खिरोडकर, संतोष गणगे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
