सत्ताधाऱ्यांच्या घरच्यांवरच कचरा उचलण्याची वेळ

KHOZ MASTER
2 Min Read

मलकापूर : प्रतिनिधी

शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच कचरा उचलण्याची वेळ आल्याने नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बारादरी-दुर्गानगर परिसरातील कचऱ्याचे ढिग अनेक दिवसांपासून उचलले जात नसल्याचा आरोप करत नगर परिषदेच्या बांधकाम सभापती शबाना परवीन साजीद अहमद खान यांचे पती साजीद खान यांनी स्वतः फावडे व टोपले घेऊन कचरा गोळा केला. त्यानंतर हा कचरा त्यांनी थेट नगर परिषदेतील आरोग्य निरीक्षक अजय बयस यांच्या कक्षासमोर टाकून प्रशासनाचा निषेध नोंदवला.

मलकापूर नगर परिषदेत काँग्रेसची एकहाती सत्ता असतानाही शहरातील स्वच्छतेच्या समस्या कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. बारादरी-दुर्गानगर प्रभागातील नाल्यांमध्ये आणि रस्त्यांवर साचलेला कचरा वारंवार सांगूनही उचलला जात नसल्याने साजीद खान यांनी आक्रमक भूमिका घेतली.

या प्रकारामुळे नगर परिषद प्रशासनातील दुर्लक्ष उघड झाले असले तरी, सत्ताधारी गटाच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे. नगर परिषदेत सत्ता असलेल्या पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी अशा पद्धतीने आंदोलन करावे लागत असल्याने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा शहरात आहे.

शहरातील स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असतानाही विविध भागांत कचऱ्याचे ढिग कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नियमित स्वच्छतेबाबत तक्रारी वाढत असताना या घटनेने नगर परिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, साजीद खान यांनी यापूर्वीही घंटागाडी चालवून स्वच्छतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी केलेले हे प्रतीकात्मक आंदोलन आहे की प्रशासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न, याबाबत शहरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

सत्ताधारी पक्षाची सत्ता असतानाही स्वच्छतेसाठी पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर ही केवळ प्रशासनाची निष्क्रियता नसून सत्ताधाऱ्यांच्या प्रभावावरही प्रश्न निर्माण करणारी बाब असल्याची चर्चा मलकापूरमध्ये सुरू आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *