सैय्यद इमरान
मालेगांव प्रतिनिधि – भारतीय प्रत्येक 18 वर्षांवरील भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकशाही अधिक सुदृढ बनविण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीचे मत हे खूप मौल्यवान असून मतदार बांधव आपल्या मताचा वापर करून राष्ट्राच्या उभारणीत आणि विकासात पूर्ण सहकार्य करू शकतात. म्हणूनच प्रत्येक प्रौढ नागरिकाने प्रत्येक निवडणुकीत आपल्या मताचा वापर केला पाहिजे. या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. लोकशाही सक्षमीकरणासाठी मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी व्हा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सीमा सुरूशे (अजित पवार गट) यांनी नवमतदारांना केले आहे.
लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असून निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातारणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्यावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा मतदार नोंदणी व प्रारूप मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविला जाणार आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. नवमतदारांना आगामी सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी आहे. याकरिता पात्र नवमतदार व ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा सर्व पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करावी. यासाठी व्होटर हेल्पलाइन अॅप किंवा व ceo.maharashtra.gov.in चा वापर करावा किंवा जवळचे मतदान केंद्रावर बीएलओकडे जाऊन नमुना 6 चा अर्ज भरावा किंवा संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सिमा सुरूशे यांनी केले आहे.
Users Today : 61