भंडारा: साकोली शहरातील न्यायालय चौकात एका युवकाने रस्त्यालगतच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने शनिवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची माहिती आहे. रस्त्यावर रहदारी सुरू असताना भरदिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. उमेश्वर सूर्यभान वाघाडे (वय ३८ रा. मांगली/ किटाडी ता. लाखनी) असं आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव असल्याची माहिती आहे.साकोलीच्या मुख्य चौकातील रस्त्याला लागून असलेल्या करंजीच्या झाडावर सायंकाळी ५ वाजता दरम्यान उमेश्वर चढले. एका बॅनरच्या लाकडी चौकटीला दोर बांधून त्यांनी गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर माहिती मिळताच साकोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. समोरील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला, भरदिवसा, रहदारीच्या वेळी अशा प्रकारची घटना घडल्याने सारेच हादरले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्यांनी मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
तणावात असल्याने आयुष्य संपवल्याची माहिती
दरम्यान, उमेश्वर हे मागील काही दिवसांपासून तणावात होते. शनिवारी ते सेंदुरवाफा येथे राहत असलेल्या त्यांच्या बहिणीकडे आले होते. बहिणीकडून घरी परत जात असताना त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे कळते. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. साकोलीचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक प्रशांत वडूले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.