“रोबोटिक्स आणि एम्बेडेड तंत्रज्ञान” विषयक कार्यशाळा संपन्न
एडुसन फाऊंडेशन आणि श्री गजानन विद्यालयाचा संयुक्त उपक्रम
नागपूर – एडुसन फाऊंडेशन आणि श्री गजानन माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “रोबोटिक्स आणि एम्बेडेड तंत्रज्ञान” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ४ मे रोजी श्री गजानन महाविद्यालयात करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन गोविंदराव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रमुख उपस्थितीमध्ये श्री गजानन विद्यालयाचे मुख्याध्यापक कमलाकर तंबाखे आणि एडुसन फाऊंडेशनचे संचालक निलेश काळे यांचा समावेश होता.
प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि एम्बेडेड तंत्रज्ञानाच्या संधींबद्दल माहिती दिली आणि त्यांनी शिक्षणाबरोबरच कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित केले. कमलाकर तंबाखे यांनीही विद्यार्थ्यांना या क्षेत्रात अद्ययावत राहण्याचा सल्ला दिला.
कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना रोबोट तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरही मार्गदर्शन करण्यात आले. विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यशाळेत पाहायला मिळाला.
बार्टीचे प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांनी बार्टीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चंदू पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज काळे यांनी तर संचालन अनंत तुळणकर यांनी केले. कार्यशाळेसाठी शाळेचे व संस्थेचे अधिकारी वर्ग व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 33