मोठी बातमी | अमरावतीत शिवसेना–भाजप युती अखेर तुटली; राज्यभर राजकीय खळबळ

Khozmaster
2 Min Read

अमरावती | प्रतिनिधी
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेली युतीची चर्चा अखेर फिस्कटली असून दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीमध्ये व्यस्त आहेत. अनेक ठिकाणी युती व आघाड्यांबाबत चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असतानाच अमरावतीत शिवसेना–भाजप युती तुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपने युती केली असली, तरी इतर ठिकाणी स्थानिक राजकीय समीकरणांनुसार हे दोन्ही पक्ष स्वतंत्र किंवा अन्य पक्षांसोबत निवडणूक लढवत असल्याचे चित्र आहे.

जागावाटपावरून मतभेद

अमरावती महानगरपालिकेसाठी शिवसेनेने भाजपकडे २५ जागांची मागणी केल्याची माहिती आहे. मात्र हा प्रस्ताव भाजपने नाकारला. दुसरीकडे भाजपकडून शिवसेनेला ८७ पैकी १५ ते १६ जागा देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. मात्र दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत न झाल्याने अखेर युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक कार्यक्रम

अमरावती महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सर्वच पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. राज्यात शिवसेना आणि भाजप युतीत असतानाही अमरावतीत वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते अभिजीत अडसूळ आज सायंकाळी साडेपाच वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती असून, पुढील भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

२०१७ चा निकाल

२०१७ च्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ४५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यावेळी चेतन गावंडे महापौर झाले होते. काँग्रेसला १५, शिवसेनेला ७, एमआयएमला १०, बहुजन समाज पार्टीला ५, युवा स्वाभिमान पक्षाला ३ जागा मिळाल्या होत्या. आरपीआय आठवले गट आणि एका अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक जागा जिंकली होती.

आता युती तुटल्यानंतर अमरावतीच्या राजकीय समीकरणांमध्ये कोणता बदल होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 9 2 6 4 4
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *