सोलापूर | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सोलापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारानेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम ठोकत एमआयएममध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार व माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी काँग्रेसची साथ सोडून एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
फिरदोस पटेल या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. २०१७ च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीसाठीही काँग्रेसने त्यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र, उमेदवारी प्रक्रियेदरम्यान पक्षाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप करत त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच झालेल्या या पक्षांतरामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचे चित्र राज्यभर दिसून आले होते. त्यानंतर नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासमोर गळती थांबवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षांतर करून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिले जात असल्याने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्रही सर्वच पक्षांमध्ये दिसून येत आहे.
Users Today : 11