केवायसी चुकलेल्या बहिणींना दिलासा अंगणवाडी सेविका करणार प्रत्यक्ष घरोघरी पडताळणी जिल्ह्यातील ५१ हजार ४८४ महिलांच्या अर्जांत तांत्रिक त्रुटी; रखडलेले हप्ते मिळण्याची आशा

KHOZ MASTER
3 Min Read

धुळे प्रतिनिधी :
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यातील तब्बल ५१ हजार ४८४ महिलांच्या अर्जांमध्ये केवायसी व तांत्रिक स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे या महिलांचे अर्ज पेंडिंग अथवा रद्द (रिजेक्ट) स्थितीत गेले होते. आता अशा महिलांची पात्रता निश्चित करण्यासाठी अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना अनेक महिलांकडून अनवधानाने चुकीची माहिती भरली गेली. केवायसी प्रक्रियेदरम्यान काही प्रश्नांची उत्तरे देताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अर्ज संशयास्पद ठरले. ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर, पात्र महिलांना लाभापासून वंचित राहावे लागू नये, तसेच अपात्र व्यक्तींना लाभ मिळू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
केवायसी चुकलेल्या बहिणींना मोठा दिलासा
केवायसी करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांचे अर्ज ‘पेंडिंग’ किंवा ‘रिजेक्ट’ झाले होते. आता अंगणवाडी सेविका स्वतः लाभार्थी महिलांकडून माहितीची खातरजमा करून आवश्यक दुरुस्ती करणार आहेत.
महा-ई-सेवा केंद्राच्या चकरा टळणार
या निर्णयामुळे महिलांना महा-ई-सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयात वारंवार जाण्याची गरज राहणार नाही. अंगणवाडी सेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन
– अर्जातील माहिती
– उत्पन्न गट व उत्पन्नाचा दाखला
– वैवाहिक स्थिती (विवाहित, विधवा, परित्यक्ता)
– आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
– रहिवासी पुरावा
– बँक खाते सक्रिय आहे की नाही
याची प्रत्यक्ष तपासणी करणार आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते रखडले
ज्या महिलांच्या अर्जात केवायसी त्रुटी आहेत, अशा अनेक लाभार्थ्यांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र ठरणाऱ्या महिलांचे हे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
केवायसीतील प्रश्नांमुळे झाला गोंधळ
‘तुम्ही सरकारी नोकरीत आहात का?’ किंवा ‘तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे का?’ अशा प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांनी चुकून चुकीचे बटण दाबले. त्यामुळे त्या अपात्र ठरल्या होत्या. आता पडताळणीमुळे हा गोंधळ दूर होणार आहे.
जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक महिलांना फटका
जिल्ह्यातील ५१ हजार ४८४ अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या असून त्यात
– ६५ वर्षांवरील महिलांची संख्या : ५,५२४
– २१ वर्षांखालील : २,४२२
– चुकीचा पर्याय निवडलेले : ४१,८२७
– लिंग चुकीचे नोंदलेले : ७११
अशी वर्गवारी करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने हप्ते रखडल्याने ग्रामीण भागात चिंता होती.
मतदानापूर्वी हप्ता मिळणार?
जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्याने, पडताळणी पूर्ण झाल्यास फेब्रुवारी महिन्यात पात्र महिलांच्या खात्यात रखडलेले पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
“जिल्ह्यातील ५०,४८४ त्रुटीग्रस्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत सुरू आहे. पात्र महिलांनी सहकार्य करावे. कोणाचाही हप्ता विनाकारण थांबवला जाणार नाही. तांत्रिक चुका दुरुस्त करणे हाच या मोहिमेचा उद्देश आहे.”
— राजेंद्र भामरे, महिला व बालकल्याण अधिकारी, धुळे

0 9 6 8 8 5
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *