नसरापूर —
भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त होत असताना, रोहित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांना न्याय देण्याचे आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले.
प्रशासनावर रोहित पवार यांची टीका
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “या प्रकरणात आवश्यक ती पावले उचलली जात नाहीत. राज्य महिला आयोग आणि बालहक्क समितीकडून अपेक्षित पाठपुरवठा झालेला दिसत नाही.” त्यांनी या प्रकरणात सरकारने सक्षम आणि अनुभवी वकील नेमण्याची मागणीही केली.
कायदेशीर मदतीची गरज अधोरेखित
भोर तालुक्यातील वकील संघटनेने घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. तसेच आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर करून जलदगतीने खटला चालवावा, असेही त्यांनी नमूद केले.
राजकीय भेटींवर कुटुंबीयांची भूमिका
दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी काही काळ राजकीय व्यक्तींना भेट न देण्याची भूमिका घेतली होती. तरीही विविध स्तरांवरील नेते आणि सामाजिक कार्यकर्ते कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे चित्र आहे.
सुनेत्रा पवार यांचीही भेट
याआधी सुनेत्रा पवार यांनीही कुटुंबियांची भेट घेतली होती आणि त्यांची मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली होती. या प्रकरणात सरकारकडून कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे.
“अध्यक्ष नसले तरी अधिकारी आहेत”
महिला आयोगाच्या संदर्भात बोलताना रोहित पवार यांनी, “अध्यक्ष नसले तरी अधिकारी आहेत, त्यांनी सक्रिय होऊन काम करणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट केले.
खळबळजनक पार्श्वभूमी
या प्रकरणातील आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
Users Today : 28