अहिल्यानगर
देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची व्याप्ती वाढवत आणखी एका संशयिताला अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे या २६ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आल्याने या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील CBI चे विशेष पथक १२ मेपासून अहिल्यानगरमध्ये दाखल झाले असून विविध संशयितांची चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
नाशिक अटकेनंतर तपासाला वेग
या प्रकरणात यापूर्वी नाशिकमधून शुभम खैरनार याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे CBI ने तपासाचा फोकस अहिल्यानगर जिल्ह्याकडे वळवला असल्याची माहिती समोर येत आहे.
तपासादरम्यान आणखी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू असल्याचे समजते. या चौकशीतून पेपरफुटी रॅकेटबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अटक टाळण्याचा प्रयत्न निष्फळ
CBI च्या माहितीनुसार, धनंजय लोखंडे याचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळले होते. मात्र अटक टाळण्यासाठी तो पुण्याहून अहिल्यानगरात गेल्याची माहिती तपासात पुढे आली. CBI पथकाने शोधमोहीम राबवत अखेर त्याला अहिल्यानगरातून ताब्यात घेतले.
१२ मे रोजी सकाळी त्याला अधिकृतपणे CBI च्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या माध्यमातून पेपरफुटी प्रकरणातील इतर आरोपी आणि नेटवर्कबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
देशभरात खळबळ
वैद्यकीय शिक्षणासाठी होणारी NEET परीक्षा देशातील अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली जाते. अशा परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील तपास अधिक व्यापक होण्याची शक्यता असून CBI कडून विविध राज्यांमध्ये चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Users Today : 16