नांदुरा प्रतिनिधी (शुभम ढवळे) :– येथील प्रतिभावान साहित्यिक निलेश रामराव देशमुख यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई यांच्याकडून राज्यस्तरीय काव्य लेखन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निलेश देशमुख यांना शालेय जीवनापासून वाचन व लेखनाची आवड आहे. विविध वर्तमानपत्र, साप्ताहिक, दिवाळी अंक, मासिकांमधून व सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांचे साहित्य प्रकाशित होत असते. त्यांच्या साहित्यात राष्ट्र, समाज व निसर्ग यांना विशेष स्थान असते. साहित्य रसिक व वाचकांकडून त्यांच्या साहित्यास भरभरून प्रतिसादही लाभत असतो.
मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या सलग काव्य लेखन स्पर्धेमध्ये निलेश देशमुख यांनी दर्जेदार कविता सादर केल्या. या सर्व कवितांनी मिळून त्यांच्या साहित्याच्या शिरपेचात पुन्हा एक अष्टपैलू काव्य लेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांना अष्टपैलू संस्कृती अकादमीचे अध्यक्ष किसन खैरे यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले. “आपल्या साहित्य कलेच्या सन्मानार्थ आपणास अष्टपैलू काव्य लेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत असून संस्थेच्या या गौरव पुरस्काराने लोकमान्यतेची साहित्य गौरव मुद्रा आपल्या कर्तुत्वावर उमटल्याचा आम्हास विशेष आनंद होत आहे “, अशा शब्दात त्यांनी निलेश देशमुख यांचा गौरव केला आहे. यापूर्वीही त्यांना वेगवेगळ्या साहित्य मंडळ, साहित्य ग्रुप च्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. “हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या साहित्याचा, वाचक व रसिकांचा सुद्धा सन्मान आहे”, असे मत निलेश देशमुख यांनी व्यक्त केले आहे.