प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार धडगाव तालुक्यातील खडक्या येथे २७ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटूंबियांनी केला आहे . यात त्यांच्या कडे मयत महिलेशी झालेले शेवटच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप असल्याचा दावा करण्यात येत आहे . असे असतांना संबंधित पोलीस निरीक्षकांनी हयगय केली असून अशा पोलीस अधिकाऱ्यांची बदली नको तर निलंबन करण्यात यावे , अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.तसेच सुरूवातीला शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे .
धडगाव तालुक्यातील खडक्या येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मयत पीडीत महिलेच्या कुटूंबियांची भेट घेवून परिस्थिती जाणून घेतली तसेच त्यांचे सांत्वन केले . यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला . यावेळी वाघ म्हणाल्या , दि . २ ऑगस्ट रोजी पीडीत मयत मुलीचे वडील पोलीसात गेल्यावर त्यांनी मुलीवर अत्याचार झाले असून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप केला.तसेच पीडीतेचे तिच्या नातेवाईकांशी झालेले अखेरचे संभाषण असणारा मोबाईल व त्यात संभाषणाची ऑडीओ क्लिप असतांना कलम ३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . यानंतर संशयित रणजित ठाकरे यास अटककरण्यात आली . खरे तर पोलीसांनी पुरावा ऑडिओ क्लिप नुसार गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते . मात्र त्यांनी यात हयगय केल्याने पीडीत मुलीच्या कुटूंबियांनी न्यायासाठी मृतदेह जाळला नाही . यानंतर दि . ७ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाल्यानंतर पुन्हा शवविच्छेदनाची मागणी करण्यात आली . न्यायालयातून परवानगी मिळाल्यानंतर मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले.यामुळे आता सदरच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर सदर प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे वाघ म्हणाल्या.त्या पुढे म्हणाल्या की , या प्रकरणात संबंधित पोलीस निरीक्षक , उपनिरीक्षक व चार पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे . मात्र कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांचे निलंबन व्हावे , वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही कर्तव्यात कसूर केली आहे किंवा नाही याच्या पडताळणीसाठी मुंबई येथील शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर तज्ञ डॉक्टरांची विशेष समिती नेमण्यात यावी , तसेच संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी , अशी मागणी केली आहे . तसेच या प्रकरणावर मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष असल्याचे ही वाघ म्हणाल्या.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते .
Users Today : 1