प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -:धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका विवाहितेच्या मृत्यु प्रकरणी तिच्या वडिलांच्या मागणी प्रमाणे सर्व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करीत पीडितेला न्याय मिळे पर्यंत काँग्रेस पक्ष अन्याया विरुद्ध लढणारे आई वडील व सर्व ग्रामस्थांच्या सोबत आहे असा विश्वास माजी मंत्री व ऑल इंडिया काँग्रेस ट्रायबल कमिटीचे चेअरमन शिवाजीराव मोघे यांनी दिला .
धडगाव तालुक्यातील खडक्या येथे एका विवाहितेवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला आहे . त्या अनुषंगाने पोलिस व शव विच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्रुटी ठेऊन आरोपींना मदत केल्याचा आरोप करत मृत पीडितेला न्याय मिळणार नाही तो पर्यंत तिचा अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा वडिलांनी व ग्रामस्थांनी घेतला आहे त्यामुळे मृत विवाहितेचे शव अंत्यसंस्कार विना मिठात पुरुन ठेवला होता . सदर प्रकरण उजेडात आल्या नंतर शासनाने पुनश्च शव विच्छेदन करण्याचा आदेश दिला होता . त्यानंतर तब्बल 43 दिवसांनंतर शव मिठातून बाहेर काढुन मुंबई येथे दुसऱ्यांदा शव विच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले होते . या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी , राहुल गांधी यांच्या आदेशान्वये काँग्रेस सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे , माजी मंत्री आमदार ऍड.के.सी. पाडवी , आदिवासी सेल चे राष्ट्रीय समन्वयक व गुजरातचे आमदार आनंद चौधरी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन धीर देत सांत्वन केले . दरम्यान शिवाजीराव मोघे , आमदार के.सी. पाडवी यांनी पीडितेला पुरलेल्या जागेची पाहणी करुन पुष्पांजली वाहुन श्रद्धांजली अर्पण केली.त्यानंतर कुटुंबियां सोबत चर्चा केली यावेळी पीडितेच्या वडिलांनी घडलेली सर्व घटना सांगितली . दरम्यान शिवाजीराव मोघे , आमदार के.सी. पाडवी यांनी काँग्रेस पक्ष कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगत पीडितेला न्याय मिळे पर्यंत आपणही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले . व कुटुंबीयांनी केलेले धाडस व पाठ पुराव्यामुळेच या प्रकरणाला वाचा फुटली असे सांगुन आपण कायद्याची लढाई लढू असे सांगितले . यावेळी पीडितेच्या वडिलांनी आपल्या बोली भाषेत हकीकत सांगितली या प्रसंगी आमदार के.सी. पाडवी यांनी दुभाषिकाची भूमिका निभावत शिवाजीराव मोघे यांना मराठीतुन घटना समजावून सांगितली . यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड . सीमा वळवी , माजी मंत्री ऍड . पद्माकर वळवी , समाज कल्याण सभापती रतन पाडवी , जि.प सदस्य विक्रम पाडवी , सुहास नाईक , माजी सभापती हारसिंग पावरा , धडगावचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण आदी उपस्थित होते .