पुण्यामध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. त्याचदरम्यान, आता पुण्यामध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने मावशी समोरच कालव्यामध्ये उडी घेतली घटना हिंगोलीच्या पिंपरी शिवारामध्ये घडली आहे.पुण्यामध्ये एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने मावशी समोरच कालव्यामध्ये उडी घेतली. ही घटना हिंगोलीच्या पिंपरी शिवारामध्ये घडली आहे. सुरज उत्तम माने (वय २५) असं तरुणाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच आखाडाबाळापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून कालव्यामध्ये उडी घेतलेल्या सुरतचा शोध पोलीस आणि गावकऱ्यांकडून घेतला जात आहे. सध्या कालव्यामध्ये धरणाचे पाणी सोडण्यात आले असल्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे.हिंगोली जिल्ह्यातील कान्हेगाव सुरज उत्तम माने हा पुण्यामध्ये अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून एमपीएससीची तयारी करत होता. तो अधून मधून गावाकडे येत होता. काही दिवसापूर्वीच तो आपले मूळ गाव कान्हेगाव येथे आला होता. घरी आलेल्या मावशीला तो सकाळी आखाडा बाळापूर येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होता. गावापासून काही अंतरावर पिंपरी शिवारात त्याची दुचाकी आल्यानंतर त्याने कालव्याच्या पुलावर अचानक आपली दुचाकी थांबवली. त्यामुळे सुरजच्या मावशीने अचानक दुचाकी का थांबवली आहेस? अशी विचारणा केली.मात्र, मावशीला काही समजण्याच्या अगोदरच सुरजने कालव्याकडे धाव घेऊन कालव्यामध्ये उडी मारली. सध्या कालव्यामध्ये ईसापुर धरणाचे पाणी सोडण्यात आले असल्यामुळे सुरज माने हा पाण्याचा प्रवाहाबरोबर वाहून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी आणि कान्हेगाव येथील नागरिकांनी कालव्याकडे धाव घेतली. त्यानंतर याबाबतची माहिती आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनपाडे, पोलीस कर्मचारी नागोराव बाभळे, विठ्ठल जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली आहे. पोलिसांनी गावकऱ्यांनी सुरज याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सुरज याने कालव्यामध्ये उडी का घेतली आहे? याचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजू शकलेले नाही.