लातूर: लातूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील तावरचा भागातील सिलेंडरमधील इस्लामपुरा भागात गॅसचा स्फोट होऊन अनर्थ घडला आहे. या घटनेत फुगे विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकूण १२ बालकं गंभीर जखमी झाली आहेत. यापैकी एक मुलगी ७० टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती आहे.
फुग्यामध्ये गॅस भरण्याच्या सिलेंडरचा स्फोट झाल्यानं एक जण जागीच ठार झाला असून १२ बालके जण गंभीर जखमी झाले आहेत. लातूर शहरातील तावरचा कॉलनी इस्लामपुरामध्ये गॅसचा स्फोट झाला. ही घटना साडे चार ते पाचच्या दरम्यान घडली. या घटनेत फुगे विकणारा एक जण जागीच ठार झाला तर बारा बालके गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी बालकांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मृत पावलेल्या ५० वर्षीय फुगेवल्याचे नाव रामा इंगळे असून तो बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील वाघाळा राडी येथील रहिवासी आहे.
लातूरच्या रुग्णालयातील प्रभारी अधिष्ठाता शैलेंद्र चव्हाण यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. साडे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास लातूरमधील तावरचा कॉलनीमधील इस्लामपुरामध्ये फुग्यामध्ये गॅस भरला जातो त्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे. त्यातील ९ जखमी लहान मुलं रुग्णालयात आलेली आहेत. त्या नऊ लहान मुलांचं वय ३ ते १२ च्या दरम्यान आहे. त्यापैकी एका पाच वर्षाच्या मुलीला ७० टक्के भाजलं आहे. बाकी मुलांपैकी एका मुलाचा हात मोडला आहे. बाकी सर्व मुलं धोक्याबाहेर आहेत.जो फुगेवाला होता, ज्याचा सिलेंडर होता त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह रुग्णालयात आणला असल्याचं शैलेश चव्हाण म्हणाले.दरम्यान, लातूर मधील या घटनेनंतर घटनास्थळी तावरजा येथील इस्लामपुरा या भागात मोठी गर्दी जमा झाली होती. फुग्यात गॅस भरण्याच्या सिलेंडरचा नेमका कशामुळं स्फोट झाला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या घटनेमुळं एका व्यक्तीला प्राणाला मुकावं लागलं तर चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत.