गेले काही दिवस मी वेगळा पर्याय शोधतेय; पंकजा मुंडेंचा भगवानगडावरुन सूचक इशारा

Khozmaster
3 Min Read

अतुल कुलकर्णी, सावरगाव (जि. बीड): ‘त्रास देणाऱ्याचे विरोधकांचे घर उन्हात बांधल्याशिवाय राहणार नाही. भगवानबाबांनासुद्धा वेगळा गड निर्माण करावा लागला; तशीच परिस्थिती आपल्यापुढेही निर्माण झाली असून, वेगळा पर्याय मी गेले काही दिवस शोधत आहे,’ अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना मंगळवारी गर्भित इशारा दिला. ‘बीड लोकसभा मतदारसंघातून लढणार नाही,’ असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

विजयादशमीदिनी भगवान भक्तिगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा यांनी हजारो समर्थकांसमोर पुन्हा एकदा मनातील खदखद व्यक्त करतानाच पक्ष नेतृत्वावर हल्ला चढवला. खासदार प्रीतम मुंडेही या वेळी उपस्थित होत्या. ‘ताईच्या नव्हे, तर आता आईच्या भूमिकेत तुमच्यासमोर आली आहे, अशी भावनिक साद पंकजा यांनी उपस्थितांना घातली. त्यांनी शेतकरी, शेतमजूर, मराठा आरक्षण, ऊसतोड मजुरांचे प्रश्न आदी विषयांवर रोखठोक भाष्य केले. प्रीतम मुंडे यांचेही भाषण झाले.‘विधानसभा निवडणुकीत पडल्यांनतर मला कुबड्यांच्या आधाराची गरज होती. मात्र, हा आधार पक्षाने नव्हे, तर लोकांनी दिला. आता आम्ही संयम दाखवणार नाही. आता विरोधकांना पाडणार,’ अशा शब्दांत त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना आव्हान दिले. ‘जे चारित्र्यहीन आहेत, पैशांच्या बळावर राजकारण करतात, त्यांना पंकजा पाडणार आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

 मी मंत्री असताना ग्रामीण भागात विकास पोहोचवला. परळी आणि इतर मतदारसंघांत दुजाभाव केला नाही. पाथर्डी तर मी माझाच मानते. परळीइतकीच विकासकामे पाथर्डीमध्ये केली.

देशात सारे आलबेल आहे म्हणून तुम्ही मेळाव्याला आला आहात का? शेतकरी सुखी आहेत का? शेतकऱ्यांना विमा मिळाला का? अनुदान मिळाले का? शेतमजुराच्या हाताला काम आहे का? महाराष्ट्रात खूप सारे गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत असताना, सरकारकडून खूप अपेक्षा आहेत, आता अपेक्षाभंग सहन करू शकत नाही.

आपल्याच सरकारने गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक बांधण्याची घोषणा करून दहा वर्षे झाली, तरी स्मारक पूर्ण झाले नाही. आता स्मारक उभारू नकाच. स्मारक उभारण्यापेक्षा शेतकऱ्यांना ऊसतोडणीतून मुक्त करून शिक्षण आणि पोषण द्या. धर्माच्या वाढलेल्या भिंती पाडा, तेच गोपीनाथ मुंडेंचे खरे स्मारक ठरेल.

मी २०२४मध्ये मैदानात आहे आणि मला कोणीही रोखू शकणार नाही. आगामी काळात मी सिंदखेड राजा येथे जाऊन राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन नगर, जळगाव, नाशिक, सिन्नर, बुलढाणा येथे जाणार आहे.

बीडमधून लढा वगैरे चालणार नाही’

‘अनेक जण मला माझ्या मतदारसंघातून लढा असे सांगत असतात. प्रीतमताईंच्या बीड लोकसभा मतदारसंघातून लढा असेही काही जण म्हणत आहेत; पण तसले काही चालणार नाही. एखाद्याच्या कष्टाचे मी खाणार नाही,’ असे सांगून त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याचे स्पष्ट केले.

0 8 9 4 6 2
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *