वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील छोटी आर्वी शिवारात खड्डा चुकवण्याच्या नादात खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडला असून या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तसंच इतर आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुक्षितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.हिंगणघाट येथील नागपूर-हैदराबाद महामार्गावर छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स पलटली. रस्त्यावरील खड्डा चुकविताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स पलटी झाली. ट्रॅव्हल्स क्रमांक सी. बी. १९ – एफ. ३३६६ ही हैदराबाद येथून रायपूरला चालली होती. ट्रॅव्हल्समधून एकूण २८ प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.ट्रॅव्हल्स भरधाव वेगात हैदराबादवरून रायपूरकडे जात असताना हिंगणघाट नजीक पोहोचली. मात्र छोटी आर्वीजवळ महामार्गावर असलेल्या खड्ड्यांचा अंदाज चालकाला आला. यावेळी खड्डा चुकविताना चालकाचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली. यात एक प्रवासी जागीच ठार झाला. गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही किरकोळ जखमी दुसऱ्या बसमध्ये बसून पुढील प्रवासाला निघून गेले आहे.दरम्यान, हिंगणघाट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. या अपघातीच नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.