कोल्हापूर : २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधान समितीने भारतीय संविधान स्वीकृत केले. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. १९४९ पासून ते आतापर्यंत देशाच्या जडणघडणीत अनेक गोष्टी घडल्या. आज आपला देश अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. मात्र, भारतीय संविधानाची मूल्ये नागरिकांमध्ये किती रुजली आहेत हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
लहानपणापासूनच समाजकार्याची आवड असणारा राजवैभव हा अत्यंत विवेकी तरुण. वडील गावचे माजी सरपंच त्यामुळे समाजकार्याचा वसा आणि वारसा त्याला घरातूनच मिळाला. राजवैभव याने इलेक्ट्रिक इंजिनियरिंगच शिक्षण पूर्ण केलं. मात्र, समाजासाठी काहीतरी करण्याची खुमखुमी त्याला गप्प बसू देत नव्हती. यामुळे लाखो रुपयांची नोकरी करण्याची संधी असताना सुद्धा ती संधी सोडून त्याने ज्या संविधानावर अखंड देश उभा आहे, ती संविधानिकमूल्ये देशासह राज्यातील किशोरवयीन मुले, शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी यांच्यासह समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची खूणगाट त्यानं मनाशी बांधली. २०१६ पासून संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र याने प्रवास सुरू केला.आतापर्यंत राजवैभवने राज्यभरात सुमारे बाराशेहून अधिक संविधान कार्यशाळा घेतल्या असून पंचवीस हजारहून अधिक जणांपर्यंत त्यानं संविधानिक मूल्ये, संविधानिक विचार पोहोचवला आहे. संविधान संवादक म्हणून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करणे, दैनंदिन जीवनात संविधान अंगीकार करणे, अंमलबजावणी करणे आणि संविधान विरोधी घटना आणि घडामोडी विधायक हस्तक्षेप करणे या चार सूत्रांवर संविधान संवादक राजवैभव शोभा रामचंद्र गेली ८ वर्ष राज्यभरात संविधानाची बीजे रुजवण्याचा प्रयत्न करत आहे.
यासाठी तो अखंड महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहे. या कार्यशाळांमधून घडलेल्या ७५ जणांची सक्रिय टीम राजवैभवच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून राज्यातील घराघरात आणि मनामनात संविधान पोहोचण्यासाठी ही मंडळी कार्यरत आहेत. तर संविधान चळवळीला व्यापक स्वरूप यावे यासाठी राज्यभरातील मान्यवर विचारवंत सामाजिक कार्यकर्ते यांचे मार्गदर्शन घेऊन राजवैभवने आपल्या गावात राजर्षी शाहू संविधान प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना संविधानांवरील व्याख्याने, भारुड, बडबड गीते, नाटक आणि चित्रपटातून संविधानिक साक्षर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ४० दिवसांच्या या प्रशिक्षण वर्गात समाजातील सर्व घटक सहभागी होत आहेत.
Users Today : 18