हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे शेतात थांबलेल्या युवकावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत राजू शंकर जायभाय (२६) असं युवकाचे नाव आहे. या तरुणाच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर युवकाच्या खांद्यावर लहान भाऊ अपंग असल्याने संसाराची जबाबदारी पडली होती.मिळालेल्या माहितीनुसार, ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पाऊस येणार असल्याचे बघून मध्यरात्री गोजेगाव, चीमेगाव शिवारात शेतात वेचणी केलेला कापूस झाकण्यासाठी जागलीवर हे तिघे जण थांबले होते. राजू जायभाय, विष्णू सिताराम नागरे आणि नवनाथ गीते हे तिघे जण रात्री शेतात जागल करत असताना ३ वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून राजू जायभाये यांचा यात मृत्यू झाला तर सोबतचे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. शेतात गेला असताना अचानक राजू यांच्यावर वीज कोसळली. क्षणात त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळतच परिसरात शोककळा पसरली आहे.मात्र या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबच हादरलं आहे. मी शेतात जाऊन लगेच येतो म्हणणार लेकरू आता परत कधीच येणार नाही. यामुळे कुटुंब धाय मोकलून रडत आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे तर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मध्ये रात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने शेती पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे हाता तोंडाशी आलेले कपाशीचे पीक आता या अवकाळी पावसाने उध्वस्त झाले. इतर पिके देखील या पावसात वाऱ्यात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे.