नांदेड: दुकानाचे शटर उघडण्यात व्यस्त असलेल्या एका सराफा व्यापाऱ्याजवळील सोन्या चांदीने भरलेली बॅग चोरट्यांनी काही मिनिटातच लंपास केली. शहरातील सिडको परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. बॅग लिफ्टिंगची ही घटना परिसरात सीसीटीव्हीत कैद झाली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सिडको येथे शिवाजी डहाळे या सराफा व्यापाऱ्याचे तुळजाई ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता दुकान उघडण्यासाठी आले. त्यांच्या एका हातात सोन्या चांदीची बॅग होती. दुकान उघडत असताना डहाळे यांनी हातातील बॅग खाली ठेवली. त्यानंतर चावीने कुलूप उघडत होते. याचवेळी एक जण पाळत ठेऊन तेथे उभा होता. तर अन्य एक चोरटा रोडवर दुचाकीवर थांबला होता. व्यापाऱ्याने आपल्या जवळील सोन्या चांदीने भरलेली बॅग जमिनीवर ठेवताच तेथे उभा असलेल्या चोरट्याने बॅग घेऊन पळ काढला.त्यानंतर तो आणि त्याचा साथीदार दुचाकीने पसार झाले. यावेळी व्यापाऱ्याने आरडाओरड केली. नागरिकांनी चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही दुचाकीवर असल्याने हाती लागले नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या बॅगमध्ये ५ तोळे सोने आणि अडीच किलो चांदी असा एकूण पाच लाख रुपयाचा ऐवज असल्याची माहिती दुकान मालकाने दिली. यासंदर्भात शिवाजी डहाळे यांच्याकडून लेखी तक्रार घेऊन पुढील शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान काही दिवसापूर्वीच येथील सराफा बाजारातून अशाच प्रकारे बॅग लिफ्टिंग झाली होती. पुन्हा त्याच भागात दिवसाढवळ्या दुसरी घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.