नाशिकः जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी शिवारात, पालखेड धरणाच्या भराव परिसरात २२ नोव्हेंबर रोजी एक मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. हा मृतदेह किशोर उर्फ टिल्लु दगु उशीर (वय २६ वर्षे रा. खडकजांब, ता. चांदवड) याचा असल्याचं निष्पन्न झालं होतं. मृतदेहाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या अन्य भागावर अज्ञात हत्याराने गंभीर वार करुन त्यास ठार केले होते. याप्रकरणी मयताचे नातेवाईक सुरेश सुधाकर कांडेकर (रा. खडकजांब, ता. चांदवड) यांनी वणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिस तपास करत असताना पोलिस तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पित्यानेच मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचं उघड झालं आहे.
दारु पिऊन शिवीगाळ करुन पैशांची सतत मागणी करणाऱ्या मुलाची वडिलांनीच १८ हजार रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी मयताच्या वडिलांसह तीन संशयितांना ताब्यात घेतले असून संशयितांमध्ये एका अल्पवयीन बालकाचा देखील समावेश आहे. दरम्यान, संदीप याला २८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी असून विधीसंघर्षित बालकाला बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही संशयितांनी किशोर उर्फ टिल्लुची हत्या केल्याचे कबुल केले असून या संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मयताचे वडील दगु जयराम उशीर यांना ताब्यात घेतले आहे.
Users Today : 11