सोलापूर : सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक १० वर्षीय मुलीचा विनयभंग झाला आहे. धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या १० वर्षीय मुलीला ओढत नेऊन तिचे चुंबन करण्याचा लाजिरवाणा प्रकार २५ नोव्हेंबर रोजी रात्री घडला आहे. याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. संशयीत आरोपीने सप्टेंबर महिन्यात त्याच गल्लीमधील एका ४ वर्षीय लहान मुलीचा बलात्कार केला होता.
याबाबतदेखील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पण, संशयीत आरोपी हा अल्पवयीन(१५) वयाचा असल्याने तो जामिनावर सुटून बाहेर आला होता. जामीनावर बाहेर येऊन त्याने पुन्हा एकदा १० वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याने संबंधित ठिकाणी भीतीदायक वातावरण पसरले आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील महिलांनी संताप व्यक्त करत संबंधित आरोपी विरोधात कायमच बंदोबस्त करा अशी मागणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर केली आहे.
१० वर्षीय मुलीसोबत लाजिरवाणे कृत्य
सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पीडित १० वर्षीय मुलगी घरी जात होती. संशयीत आरोपी हा पीडित मुलीला धरून तिला बाजूच्या बोळात घेऊन गेला आणि किस करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने स्वतःची सुटका करून पळ काढला आणि घरी जाऊन आई वडिलांना सांगितले. पीडितेचे आई वडील हे पोलीस स्टेशनला जात असताना, संशयीत अल्पवयीन आरोपी, विजय अशोक गायकवाड आणि बजरंग अशोक गायकवाड यांनी दमदाटी केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या आई वडिलांनी संशयीत अल्पवयीन आरोपी, विजय गायकवाड आणि बजरंग गायकवाड यांच्या विरोधात २६ नोव्हेंबर रोजी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात भा.द.वि.३५४, ५०४, ५०६ व बाललैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस तक्रार का दिली म्हणून पीडितेच्या आई-वडिलांना मारहाण
विनयभंगची पोलीस ठाण्यात तक्रार का दिली याचा जाब विचारत पीडितेच्या आई वडिलांना मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. पीडितेच्या वडिलांनी फिर्याद सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणी गायकवाड(वय ३५ वर्ष),राजू गायकवाड(वय ६०वर्ष )या दोघां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.