रेल्वे स्थानकात स्फोटके घेऊन शिरला दहशतवादी ?

Khozmaster
2 Min Read

 रेल्वे स्थानकात कारने आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक स्फोटके घेऊन प्रतिक्षालयात घुसला. लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळताच अवघ्या एका तासात एटीएस व इतर सुरक्षा विभागाच्या मदतीने दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. ही रंगीत तालीम सोमवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्थानकावर अनुयायांची मोठी गर्दी असते. त्याचप्रमाणे येत्या ७ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे व्हीआयपी लोकांची मांदियाळी नागपुरात राहणार आहे. त्यामुळे नागपूर स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक राहावी म्हणून लोहमार्ग पोलिस, दहशतवादी विरोधी पथक, रेल्वे सुरक्षा बलाने रंगीत तालिममध्ये सहभाग घेतला.

एका कारमध्ये दोन दहशतवादी रेल्वे स्थानकात घुसल्याची माहिती लोहमार्ग पोलिस कर्मचाऱ्याला मिळाली. त्याने लगेच ही माहिती पोलिस निरीक्षक मनिषा काशीद यांना दिली. काशीद यांनी लागलीच दखल घेऊन एटीएस, आरपीएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणेला सूचना देऊन सतर्क केले. एका दहशतवाद्याला परिसरातून सापळा रचून अटक केली. त्याचा साथीदार हा वेटिंग हॉलमध्ये स्फोटके घेऊन बसल्याची माहिती मिळाली.

बॉम्ब शोधक व नाशक पथक व एटीएसने लगेच त्याला टिपून त्याच्याकडील स्फोटके निकामी केली. दहशतवाद्यांना अटक झाल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा श्वास घेतला. या प्रात्याशिकात लोहमार्गचे ४ पोलिस अधिकारी, २० कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा बल २ अधिकारी, १० अमंलदार, गोपनीय कर्मचारी, सीताबर्डी ठाण्याचे १ अधिकारी व ५ अमंलदार असे एकूण १२ अधिकारी व ५९ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

0 8 9 4 5 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *