एक महिन्यात कासारी नदीचे पात्र दुसऱ्यांदा कोरडे

Khozmaster
2 Min Read

माजगावः पुलाजवळ कासारी नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे कृषी पंपांचे फुटबॉल उघडे पडले आहेत.

कासारी नदीचे पात्र महिन्यात दुसऱ्यांदा कोरडे

ऐन रब्बी हंगामात चौदा गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

सागर चौगलेः सकाळ वृत्तसेवा

माजगाव, ता.१०ः गेळवडे या प्रमुख धरणासह इतर पाच लघु प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असताना यवलूज ते कसबा ठाणे (ता.पन्हाळा) या बंधाऱ्यादरम्यानचे कासारी नदीचे पात्र एक महिन्याच्या आत दुसऱ्यांदा जागोजागी कोरडे पडले आहे. यामुळे कृषी पंपांसह सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेचे फुटबॉल उघड्यावर पडले आहेत. परिणामी पाण्याची कमतरता भासत असून या बंधारा पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या चौदा गावच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाटबंधारे विभागाने नदीत पाणी सोडून नदीच्या पाणी पातळीत वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

कासारी नदीला गेळवडे या मध्यम प्रकल्पासह पडसाळी, नांदारी, पोंबरे, कुंभवडे, केसरकर या लघु पाटबंधारे प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो. या नदीवर उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या नदीवरील यवलूज पोर्ले हा शेवटचा बंधारा आहे. या बंधारा पाणलोट क्षेत्रात यवलूज, पडळ, सातार्डे, माजगाव, पोर्ले, खोतवाडी, देवठाणे, शिंदेवाडी, माळवाडी, उत्रे, पिंपळे, आळवे, वाघवे, गोलिवडे आदी चौदा गावांचा समावेश आहे. तीन वर्षांपूर्वी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. पण पाटबंधारे विभागाकडून या बंधारा क्षेत्रात नदीमध्ये पुरेशा दाबाने पाणी सोडले जात नाही. यामुळे वारंवार नदीची पाणीपातळी खूपच खालावते. सद्यस्थितीत नदीचे पात्र जागोजागी कोरडे पडले आहे. कृषी पंपाचे ‘फुटबॉल’ व सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेचे इंटेक चेंबर उघडे पडले आहेत. परिणामी पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे रब्बी हंगामातील उसाला जादा पाण्याची गरज भासत असताना नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

‘कसबा ठाणे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तर शिंगणापूर बंधाऱ्यातून पाणी पूर्वी पेक्षा कमी प्रमाणात येत आहे. तसेच यवलूज बंधाऱ्यातून पाण्याची गळती होत आहे. यामुळे कासारीची पाणी पातळी कमी होते. यंदा धरणातील पाणी काटकसरीने वापरण्याचे नियोजन केले आहे. गेळवडे धरणातून पाणी सोडले असून येत्या दोन दिवसांत नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल.

वैजनाथ स्वामी,
शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग

‘नदीची पाणी पातळी फारच खालावल्यामुळे नळपाणी पुरवठा जॅकवेलच्या पंपाला पाणी नाही. यामुळे गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.’

महेश पाटील, उपसरपंच, माजगाव

0 9 3 8 4 0
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *