पुणे – पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत (ता.११) फक्त १३३.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ६७.११ टक्के इतके आहे. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने, गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत सध्याचा पाणीसाठा हा ६०.३० टीएमसीने कमी आहे.
गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण १९३.४२ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे ९७.५१ टक्के इतके होते. त्यामुळे यंदाचा आजअखेरचा उपलब्ध पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०.४० टक्क्यांनी कमी झाला आहे.
या २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या सहा धरणांमधील पाणीसाठा वेगळा आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे ही टाटा समूहाची आहेत. टाटा समूहाची धरणे वगळता उर्वरित २६ धरणे आहेत.पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.सर्व प्रमुख धरणांसह जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे.
‘खडकवासला’त २४ टीएमसी पाणी
दरम्यान, पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत २४.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या चार धरणांमध्ये टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत या चार धरणांमध्ये एकूण २६.३५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता.
यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील एकूण पाणीसाठा हा २.२५ टीएमसीने कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरण साठा आकडेवारी अहवालातून हे उघड झाले आहे.
‘उजनी’त फक्त १३.२५ टीएमसी साठा
जिल्ह्यातील उजनी धरणांत सध्या फक्त १३.२५ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत केवळ २४.७२ टक्के इतकेच आहे. गेल्या वर्षी याच धरणांतील आजच्या तारखेचा उपलब्ध पाणीसाठा हा ५८.८३ टीएमसी (११० टक्के) इतका उपलब्ध होता. यानुसार उजनी धरणांत गेल्या वर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा ४५.५८ टीएमसी कमी पाणीसाठा आहे.
‘टाटां’च्या धरणांत ३४.९० टीएमसी पाणी शिल्लक
दरम्यान, पुणे जिल्ह्यात टाटा उद्योग समूहाची सहा धरणे आहेत. या सहा धरणांमध्ये मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या सहा धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही ४२.७६ टीएमसी इतकी आहे. यापैकी सध्या ३४.९० टीएमसी (८१.६१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
प्रमुख धरणांमधील आजचा साठा (टीएमसीमध्ये)
– टेमघर — १.७९
– वरसगाव — ११.०४
– पानशेत — ९.९६
– खडकवासला — १.३१
– पवना — ७.०६
– चासकमान — ७.१२
– भामा आसखेड — ६.५७
– आंद्रा — २.५१
– गुंजवणी — ३.५६
– भाटघर — १९.०७
– नीरा देवघर — ९.६८
– वीर — ५.४४
– माणिकडोह — ७.८४
– येडगाव — १.८९
– डिंभे — ११.७६
Users Today : 16