Kolhapur News : गडचिरोली जिल्ह्यात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीबद्दल देण्यात येणाऱ्या भरपाईत वाढ करण्याचे आदेश वनमंत्र्यांनी नुकतेच दिले. असे असले तरी कोल्हापुरात हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीच्या घटनांत दुपटीने वाढ झाली आहे, मात्र कोल्हापूरला मिळणाऱ्या भरपाईत कोणतीही वाढ जाहीर केलेली नाही.
त्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, नाराजीचा सूर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत हत्तींकडून नुकसान होण्याच्या घटना दीडशेहून अधिक घडल्या, मात्र भरपाई जेमतेम पाच हजार ते मृत्यू झाल्यास दहा लाख एवढी जै से थे आहे.
गडचिरोली परिसरात घनदाट जंगल आहे. तेथील जंगली भागात असलेल्या आदिवासींची गावे आहेत. हत्तींचा कळप आला की, शेतीचे नुकसान करतो. तसेच नागरीवस्तीत नुकसान करतो. त्यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी नुकतीच बैठक घेऊन तेथील भरपाईत वाढ करण्याचे आदेश दिले.
थोड्याफार फरकाने अशीच स्थिती कोल्हापुरात आहे. जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीपर्यंत हत्ती येतात. मात्र जास्त काळ वास्तव्य आजरा, चंदगड, भुदरगड याच भागात असतो.
येथेही शेती आहे. जंगला शेजारीही वाड्या-वस्त्या आहेत. हत्ती रात्री-अपरात्री किंवा कधी दिवसाही शेतात फिरतो. नारळी, काजूच्या बागा उद्ध्वस्त करतो. भात पीक, उसाचे नुकसान करतो; तर काही वेळा नागरीवस्तीत येऊन पाण्याच्या टाक्यापासून ते घराच्या भिंतीपर्यंतचे नुकसान करतो.
हत्तीने केलेल्या हल्ल्यात आजवर २२ जण जखमी झाले. तिघांचा मृत्यू झाला, तर गेल्या दोन वर्षांत नुकसानीच्या घटना दीडशेवर झाल्या. यावर वनविभागाकडून हत्तीकडून नुकसान झाल्यानंतर पंचनामे होतात. थोड्याफार पाठपुराव्यानंतर भरपाई जरूर मिळते; मात्र ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे.
वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड भागात डोंगरीभागात शेती करणे खर्चिक बाब आहे. वर्षानुवर्षे बागांची काळजी घ्यावी लागते. अशात हातातोंडाला आलेल्या पिकांचे हत्तींकडून नुकसान होते. पन्नास हजारांचे नुकसान झाले, तरी कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात कमी पडलेल्यांना कमी भरपाई मिळते. याची शासनाने फारशी गांभीर्याने नोंद घेतलेली नाही, असेच दिसते.
Users Today : 19