आज व्ही व्ही आय पी सर्किट हाऊस पुणे येथे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगर रस्त्यावर एनएचआयच्या माध्यमातून होणारा दुमजली उड्डाणपूल आता वाघोलीऐवजी थेट रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय झाला. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो व प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. नागपुर हिवाळी अधिवेशनात पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरील लक्षवेधीत मी नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. यावर मंत्री उदय सामंत साहेब यांनी सभागृहात ही बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. या बैठकीत नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी एनएच आयच्या माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत जो दुमजली उड्डाणपुल प्रस्तावित आहे. तो थेट विमाननगर- रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एनएच आयला दिल्या. नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत असलेला मेट्रो मार्ग थेट पुणे विमानतळापर्यंत जोडा असे आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्याना दिले. याबाबत तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले.
तसेच शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग ( ग्रेड सेपरेटर) उभारण्यात येणार असून त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी असे आदेश उपमुख्यमंत्र अजितदादा पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
यावेळी रखडलेल्या शिवणे- खराडी रस्ताबाबतही चर्चा झाली. हा रस्ता तातडीने मार्गी लावण्यासाठी तातडीने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी आणि या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी सुचना अजितदादा पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याना दिल्या. तसेच आपल्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील धानोरी, संतनगर, फाईव्ह नाईन चौक ते धानोरी, विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करावी आणि त्यासंदर्भात कार्यवाही करावी अशा सूचनाही अजितदादा पवार यांनी बैठकीत केल्या.या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे, श्री गोखले, वाहतूक पोलिस सहआयुक्त श्री खाडे पुणे महानरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Users Today : 46