ऊर्जा विभाग भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेचा कणा !
महानिर्मितीद्वारे महासंकल्प रोजगार अभियानाअंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रियेत निवड झालेल्या 1,042 उमेदवारांना आज सह्याद्री अतिथीगृह येथे नियुक्ती पत्र प्रदान केले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी व उमेदवार उपस्थित होते.
भारत एक वेगाने वाढणारी विकसनशील अर्थव्यवस्था असून 2030 साली आपण जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत.
ऊर्जा विभाग हा या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. इकॉनॉमिक ॲडव्हायजरी कौन्सिलने महाराष्ट्राला 1 ट्रिलयन डॉलर इकॉनॉमी बनविण्याचा रोड मॅप दिला असून यामध्ये 1.75 पटींनी ऊर्जा निर्मिती व वापर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऊर्जा विभागासमोर हे एक आव्हान आहे. यासाठी आपल्याला वीजनिर्मितीच्या सर्व साधनांचा उपयोग करावा लागेल.
2035 साली ज्यावेळेस महाराष्ट्र 75 वर्षांचा होईल त्यावेळच्या ऊर्जेची मागणी लक्षात घेता पुढील 3 महिन्यांमध्ये त्याचा रोड मॅप तयार केला जाईल.
सरकारने सरळ सेवा भरतीच्या प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात 75,000 पदे भरण्याचा विचार केला पण अंदाजानुसार येत्या काळात 1,50,000 पदे महाराष्ट्रात भरली जातील.
यातील 1 लाख 30 हजार पदांचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.
ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांमध्ये 15,000 पदे भरली जात असून लवकरच 350 जणांना नियुक्तीपत्र मिळणार आहे व 1,500 जणांची पदोन्नती होणार आहे.
ही नियुक्ती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने केली जात असल्याने युवकांचा प्रक्रियेवर विश्वास वाढला आहे.
1,042 पदांपैकी 70% पदे अ आणि ब वर्गातील असल्याने उच्चशिक्षितांची यात निवड झाली. महानिर्मितीच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य अभियंता पदी महिलेची निवड झाली असून ही एक चांगली सुरुवात आहे. येत्या काळात मुख्य अभियंत्यांच्या 50% पदांवर महिलाच दिसतील !