नवमतदारांना नावनोंदणीसाठी आता ५ जानेवारीपर्यंत सुवर्णसंधी नवमतदारांनी विशेष पुनरीक्षण यादी कार्यक्रमात नावनोंदणी करावी

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा,  (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार यादीच्या सुधारित विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, आता यामध्ये नवमतदारांना नावनोंदणी करण्यासाठी ५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र नवमतदारांनी नावनोंदणी करण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

            भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक १ जानेवारी २०२४या अर्हता दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या २७ डिसेंबर २०२३ च्या पत्रानुसार सुधारित पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार दिनांक ५ जानेवारी २०२४ पर्यंत सर्व नागरीक आपले मतदार नोंदणी अर्ज Online स्वरूपात https://voters.eci.gov.in व voter helpline app चा वापर करून सादर करू शकतात किंवा ऑफलाईन स्वरूपात संबंधित केंद्र स्तरीय अधिकारी किंवा केंद्रस्तरीय एजंट (BLO, BLA) व संबंधित तहसिल कार्यालयांशी  संपर्क साधून नावनोंदणी करता येणार आहे.

वरील नमूद दिनांकापर्यंत प्राप्त दावे व हरकती दिनांक १२ जानेवारी २०२४पर्यंत निकालात काढण्यात येणार आहेत. तसेच २२ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

            त्यामुळे वरील कार्यक्रमानुसार नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाणार आहे. सोबतच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सद्यस्थितीमध्ये मतदारांच्या छायाचित्र साधर्म्य आणि ठिकाण साधर्म्याबाबत सर्व दुबार नोंद असलेल्या मतदारांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्याबाबत संबंधित केंद्र स्तरीय अधिका-यांना कायम ठेवावयाची व वगळणी करावयाच्या नोंदीबाबत अचूक माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

            नागरिकांना मतदार नोंदणीसंदर्भात येणा-या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र निःशुल्क क्रमांक १९५० कार्यान्वित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये नागरिकांनी मतदार नोंदणी करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालय, केंद्रस्तरीय अधिका-यांसोबत संपर्क साधून मतदार नोंदणी, वगळणी, दुरूस्ती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *