गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळवून देणारच
आ. शिवेंद्रसिंहराजे; साताऱ्यातील महामेळाव्यात दिला शब्द
सातारा- गिरणी कामगारांमुळेच मुंबईची शान वाढली. गिरणी कारणांमुळेच मुंबईचे महत्व वाढले पण, आज तेच गिरणी कामगार गेली ४० वर्ष हक्काच्या घरासाठी झगडत आहेत. कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आ. सुनील राणे यांच्या सहकार्याने आपण गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर निश्चितच मार्ग काढणार आहोत. सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांना लवकरच हक्काची घरे मिळवून देऊ, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. मेळाव्याला कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आ. सुनील राणे आणि म्हाडाचे संबंधित अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गिरणी कामगार संघटनेचे विजय चव्हाण, आनंद मोरे, तेजस कुंभार आदी पदाधिकारी, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, सातारा तालुका खरेदी- विक्री संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव, पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज घोरपडे, माजी उपसभापती अरविंद चव्हाण, दिलीप निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. सुनील राणे यांच्या माध्यमातून गिरणी कामगारांचे प्रश्न निश्चितच सुटणार आहेत. गिरणी कामगार आणि वारस यांची पात्रता निश्चित करण्यासाठी आज मेळावा घेण्यात आला आहे. याठिकाणी कागदपत्र तपासणीसह ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधाही आपण उपलब्ध करून दिली आहे. या मेळाव्याचा उद्देश फक्त एकच आहे आणि तो म्हणजे गिरणी कामगारांना घरे मिळवून देणे! गिरणी कामगारांच्या इच्छेनुसार नवी मुंबई, वाशी, पुणे, अगदी साताऱ्यातही त्यांना घरे उपलब्ध व्हावीत याबाबत आपण आ. राणे यांच्याशी चर्चा केली आहे. गिरणी कामगारांचा घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वतः या कामगारांच्या सोबत आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
आ. राणे म्हणाले, आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून आज याठिकाणी गिरणी कामगारांचा विराट मेळावा भरला आहे. हजारो कामगार आणि मयत कामगारांचे वारस उपस्थित आहेत. या सर्वांची पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया आपण सुरु केली आहे. या सर्वांना घरे मिळतीलच यासाठी आपण एकत्रपणे पुढे जाणार आहोत. ज्यांचे कागदपत्र नाहीत पण, त्यांनी १९८२ पूर्वी गिरणी कामगार म्हणून काम केलेले आहे, यांच्याबाबतही आपण सकरात्मक निर्णय घेऊन सर्व गिरणी कामगार, वारस यांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. आ. राणे यांनी यावेळी गिरणी कामगार यांच्या घरे मिळण्याच्या प्रक्रियेचा आणि आतापर्यंत झालेल्या सोडतीचा आढावा उपस्थित गिरणी कामगारांसमोर मांडला.
मेळावा यशस्वी होण्यासाठी अमर मोरे, चेतन सोळंकी, सोमनाथ गोडसे, धीरज शेलार, प्रथमेश जाधव, अजय काशीद आदींनी परिश्रम घेतले. मेळाव्याला सातारा आणि सांगली जिल्ह्यातील हजारो गिरणी कामगार उपस्थित होते.