मागच्या दोन वर्षांपासून धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील अनेक शेतशिवारात गोगलगायींची उपद्रवमूल्यता वृद्धिंगत होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या मृगाची दमदार बरसात होत आहे. यात सुप्तावस्थेतील गोगलगाय ‘मेटिंग’साठी बाहेर येत असून, याचा वेळीच पायबंद केल्यास पुढील काळात प्रादुर्भाव कमी राहील, असे कृषी विभागाने म्हटले आहे.
गतवर्षी तालुक्यातील विविध गावांत शंखी गोगलगाय असंख्य शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप ठरली होती. यात अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पेरणीनंतर बिजांकुर झालेल्या कोवळ्या रोपांची पाने फस्त करून पिकांचे नुकसान करणाऱ्या या गोगलगायींचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती.
यातही तेरणा नदीकाठचा भाग तसेच नदी अन् ओढ्याच्या काठावर असलेल्या क्षेत्रात याचा अधिक प्रादुर्भाव जाणवला होता. या पार्श्वभूमीवर यंदाचा हंगाम सुरू झाला असताना पुन्हा गोगलगायींचे संकट घोंगावत आहे. मृगाची दमदार बरसात झालेली आहे. या पावसाच्या वातावरणात सुप्तावस्थेत असलेली गोगलगाय बाहेर येऊन अंडी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्या अनुषंगाने येणाऱ्या हंगामात सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपापल्या अधिनस्त गावातील सर्व शेतकऱ्यापर्यंत आपण समर्थपणे तोंड देण्यासाठी गोगलगाय नियंत्रणाबाबत सक्षम राहू, असे आवाहन तालुका कृषी जाणीवजागृती वाढवावी, जेणेकरून अधिकारी भागवत सरडे यांनी केले गोगलगायींच्या मोठ्या संकटाला आहे.
आऊटब्रेक टाळणे आपल्या हातात…
सध्या काही गावांत गोगलगाय दिसून येत आहेत. त्या येणाऱ्या दिवसात मेटिंगसाठी सज्ज असतील. याचा भविष्यकाळ आऊटब्रेक टाळायचा असेल तर शेतकऱ्यांनी यास मोहीम स्वरूपात उपाय करायला हवेत. कृषी विभागाने याबाबत जनजागृती करणारे पोस्टर तयार केले आहेत. ते प्रत्येक गावात दर्शनी भागात चिकटवले जाणार आहेत, असे तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी सांगितले.
अशा करा प्रतिबंधात्मक उपाययोजना
■ बांध स्वच्छ ठेवावेत. तरच निर्मुलन शक्य आहे. प्रादुर्भाव वाढण्यापुर्वीच उपाययोजना केल्या तर पिकाला फटका बसणार नाही. यासाठी गोगलगाय नियंत्रणासाठी सामुहिक मोहीम राबवणे आवश्यक.
■ सोयाबीन रोपावस्थेत असताना रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग किंवा सुतळी बारदाना पाण्यात भिजवून प्रती एकरी दहा ठिकाणी ठेवावा.
■ बांध्याव्यतिरिक्त आत शेतामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला असेल तर प्रत्येक चार ओळीनंतर ओळीच्या बाजुने ५ फुट अंतरावर स्नेलकिल औषधाच्या गोळ्या टाकाव्यात.
■ सकाळी ६ ते ८ च्या दरम्यान ढिंगाखाली किंवा बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.
■ सोयाबीन पेरणीनंतर पूर्ण शेताभोवती बांधाच्या आतल्या बाजुने ५ सेमी रुंदीचा चुन्याचा पट्टा ओढून घ्यावा. लगेच बांधाच्या आतल्या साईडने मेटाल्डीहाईड २.५ टक्के (स्नेलकिल) या औषधाच्या पेलेटला कट करून बारीक गोळ्यात रुपांतर करावे आणि संपूर्ण शेताच्या भोवती बांधाच्या आतल्या बाजुने ५। ५ ते ७ फुटावर एक गोळी टाकावी.
‘त्या’ मेटिंगसाठी सज्ज…
मागच्या आठ दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे रस्त्यालगत, ओढे व नदी शेजारील भागात गोगलगाय सुप्तास्थेत मेटिंगसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान, अंड्यातून बाहेर येणाऱ्या गोगलगायींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर दिसू शकतो. त्यामुळे नियंत्रणाचे प्रभावी उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे झाले आहे, असे कृषी पर्यवेक्षक उमेश पोतदार यांनी सांगितले.