गायी-गुरांसाठी पावसाळ्यातील ‘हे’ आजार धोकादायक, काय काळजी घ्याल?

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा : पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात.

वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते. त्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत ग्रामीण भागात जनजागृती सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

शेतीकामासाठी बैल आणि दुधासाठी गायी-म्हशींचे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्व आहे, तर शेळी-मेंढी पालनासारखे जोडधंदे बळीराजाच्या उत्पन्नात भर घालतात. पावसाळ्यात जनावरे चरायला शेतात नेत असाल, तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बदलत्या वातावरणात प्राण्यांचे शरीर योग्यप्रकारे साथ देत नसल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन जनावरे विविध प्रकारच्या आजाराला बळी पडतात. त्यामुळे गोठ्याची काळजी, लसीकरण, जंतनाशक औषधांचा वापर, चाऱ्याचे योग्यप्रकारे नियोजन करून आपल्या जनावरांची पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

गोठ्यात हे नक्की करा….

गोठ्यात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश व हवा कशी येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. गोठा पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने धुवून कोरडा ठेवावा, गोठ्यातील जनावरे एकाच ठिकाणी जास्त वेळ बांधून ठेवू नका. गोठ्यातील शेण, मूत्र वारंवार बाजूला करा. पाऊस पडत असताना गोठ्याच्या बाजूला आडोसा करावा. त्यामुळे पावसाचे पाणी गोठ्याच्या आत येणार नाही. त्यासाठी वेळीच काळजी घ्यावी. जनावरांना शक्यतो भिजलेला चारा खाऊ घालू नका. ओले गवत जनावरे कमी वेळेत व अधिक खातात, त्यामुळे जनावरांच्या पोटाचे आरोग्य बिघडून प्रसंगी जनावराच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे पशुखाद्य किंवा चारा कोरडा ठेवण्यासाठी दक्षता घेतल्यास पशुधन संसर्गजन्य आजारांपासून दूर राहणार आहे.

पावसाळ्यात जनावरांमध्ये विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात. हे आजार विविध माध्यमांतून निरोगी जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. त्यासाठी गोठा स्वच्छ व कोरडा ठेवण्यावर पशुपालकांनी भर द्यावा. पशुपालकांनी पावसाळ्यात गुरांची निगा राखणे आवश्यक आहे.
– युसुफ चौधरी, पशुधन पर्यवेक्षक

जनावरांना पावसाळ्यात होणारे प्रमुख ७ आजार
घटसर्प
 : गाय, म्हैस, शेळी, मेंढीमध्ये होणारा संसर्गजन्य रोग.
सरा : डास, माशा व इतर कीटक यांच्या चाव्यामुळे या रोगाचा प्रसार निरोगी जनावरांमध्ये होतो. हा रोग गाय, म्हैस, घोडा व उंटांमध्ये आढळतो.
बॅबेसिओसिस : एक पेशीय जंतूमुळे होतो व प्रसार पिसके चावल्यामुळे होतो. संकरित जनावरांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते.
फऱ्या : जनावरांमधील संसर्गजन्य रोग.
हगवण : गायी-म्हशींना होतो.
पिपअर : शेळ्यांमधील विषाणूजन्य साथीचा रोग.
थायलेरिओसिस : हा रोग संकरित जनावरांमध्ये व वासरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.

0 6 3 9 0 6
Users Today : 199
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *