पुण्यात पाऊस पुन्हा सक्रीय; पुढील दोन दिवसही मुसळधारेचे; जिल्ह्याला IMDचा रेड अलर्ट

Khozmaster
2 Min Read

पुणे : वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे सक्रिय झालेल्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार हजेरी लावली. शहराच्या बहुतांश भागात, जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास तासभर जोराचा पाऊस पडला. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर संध्याकाळपर्यंत संततधार सुरू होती. पुढील दोन दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असून, भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे (आयएमडी) पुणे शहराला ‘ऑरेंज ॲलर्ट’ आणि जिल्ह्याला ‘रेड अॅलर्ट’ देण्यात आला आहे.मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात २८ सप्टेंबरपर्यंत पाऊस होणार आहे. याच घडामोडींमुळे पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मंगळवारीदेखील सकाळपासून आकाशात ढग दाटून आले होते. उकाडाही वाढला होता. दुपारी एकदरम्यान ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या सरींमुळे नागरिकांची धांदल उडाली. तासभर जोरदार सरी बरसल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागांत रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते. अनेक ठिकाणी चौकांमध्ये पाणी साठले होते. तीनपर्यंत पावसाचा जोर कायम होता. यानंतर मात्र हलक्या सरी बरसल्या. पुन्हा संध्याकाळी मोठी सर येऊन गेली. ऑफिसमधून नागरिक घरी जात असताना पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली नाही. पुण्यात रात्री साडेआठपर्यंत १९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव, येरवडा, हडपसर भागांत जास्त पाऊस पडला. दिवसभरात कमाल ३१.१ आणि किमान २२.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे. आकाश दिवसभर ढगाळ राहून, ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पाऊस ओलांडणार हजारचा टप्पा

जूनच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक हजेरी लावलेला पाऊस तिन्ही महिने सरासरीपेक्षा जास्त नोंदवला गेला. पुणे शहरात एक जून ते २४ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ५७० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा याच काळात ९६८.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ‘आयएमडी’ने पुढील चार दिवसांत पुणे जिल्हा आणि शहरासाठी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांप्रमाणे पावसाचा जोर कायम राहिल्यास या महिन्यात पाऊस एक हजार मिलिमीटरचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *