पुण्यात प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, कॉलेज विद्यार्थिनीला पार्टीला बोलवून चौघांचं दुष्कृत्य

Khozmaster
2 Min Read

 पुणे : शिक्षणाच्या माहेरघरात सावित्रीच्या लेकी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न नेहमीच पडत असतो. कारण पुण्यात स्त्री अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर नेऊन चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी घडलेली ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलीची ओळख सोशल मीडियाद्वारे झाली. पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती, यावरून दोघांची मैत्री झाली. त्यानंतर पीडित मुलीला पार्टीसाठी फ्लॅटवर नेण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आला.

वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार

हा प्रकार इथेच थांबला नसून, चार मुलांनी वेळोवेळी महाविद्यालयात तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार महाविद्यालयात सुरू असलेल्या “गुड टच अँड बॅड टच” या कार्यक्रमाद्वारे समोर आला, आणि त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पीडिता प्राध्यापकाची मुलगी

विशेष म्हणजे पीडित मुलगी ही एका प्राध्यापकाची मुलगी आहे. प्राध्यापकाने याबाबतची तक्रार ट्रस्टींकडे केली होती, परंतु ट्रस्टींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आरोपी मुलांना का वाचवले जात आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे.

रवींद्र धंगेकरांचे आरोप

कोरेगाव पार्क ड्रग्स पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अश्या घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो, प्रत्येक प्रकरणातील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु दरवेळेला अश्या घटनांना गुन्हेगारां इतकेच या व्यवस्थेतील घटक देखील जबाबदार असतात, असा आरो धंगेकरांनी केला आहे.आजच्या या घटनेतील सर्व माहिती माझ्या पत्रात मांडली आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना व पुणे शहराच्या पालकमंत्र्यांना ही विनंती राहील की आपण देखील या घटनेकडे तितक्याच गांभीर्याने पाहत घटनेतील पीडित व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि आरोपीला इतके कठोर शासन करावे की पुन्हा कोणीही आशा प्रकारचे कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही, अशी विनंतीही रवींद्र धंगेकरांनी केली आहे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *