डिग्रस बुद्रूक, दि. १ (प्रतिनिधी) –
देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे डिग्रस बुद्रुक येथे सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीमुळे गावातील शांतता धोक्यात आली असून तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत आहे. दारूच्या व्यसनातून २४ जानेवारी २०२६ रोजी एका तरुणाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडूनही संबंधित अवैध दारू विक्रेत्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत ग्रामपंचायत डिग्रस बुद्रुक व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या वतीने ३० जानेवारी २०२६ रोजी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात गावातील मधुकर कुंडलिक हुसे, अंनता विठोबा मांटे, सै. मकसूद सै. अजगर व भाऊराव जयभाये यांच्यावर एमपीडीए कायदा अथवा तडीपारी अंतर्गत कठोर कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.
अवैध दारूमुळे गावातील अनेक तरुण व्यसनाधीन झाले असून घरगुती वाद, भांडणे तसेच कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी वारंवार ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलीस प्रशासनाला माहिती दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे भाऊराव जयभाये हे खुलेआम अवैध देशी दारू विक्री करत असून वारंवार समज देऊनही त्यांनी हा व्यवसाय बंद केलेला नाही. संबंधित व्यक्तींवर यापूर्वीही अंढेरा पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
गावातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात+ आला आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन कोणती ठोस भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Users Today : 16