अकोला प्रतिनिधी :
शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थ नगर परिसरात जुन्या वादातून लोखंडी पाइप व तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तारफैल येथील विजयनगर परिसरात राहणारा लक्ष्मण किसन कचोटे हा जुन्या वादाच्या कारणावरून लोखंडी पाइप व तलवार घेऊन परिसरात फिरत होता. त्याच्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेत त्याच्यासोबत सुदर्शन उर्फ ‘टायसन’ पंकज कांबळे (रा. तारफैल, विजयनगर, अकोला) यानेही नागरिकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची तक्रार समोर आली. त्यामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून लोखंडी पाइप व तलवार जप्त केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे
Users Today : 36