जळगाव प्रतिनिधी :
वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने गावठी बंदुकीतून बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगरातील श्रीराम चौक परिसरात राहणारे रसाल राठोड (वय 48) हे नेरीनाका स्मशानभूमी परिसरातून कामानिमित्त जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून वाद घालत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात रसाल राठोड यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
जखमी अवस्थेत त्यांनी आपल्या मुलगा अनिल राठोड याला फोन करून घटनेची माहिती दिली. वडिलांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच संतापलेल्या अनिलने हल्लेखोरांचा शोध सुरू केला.
काही वेळातच वाल्मिक नगरातील घरकुल चौक परिसरात त्याला वडिलांना मारहाण करणारे तिघे बसलेले दिसले. संतापाच्या भरात अनिलने दुचाकी त्यांच्या दिशेने वळवून कमरेला लावलेल्या गावठी बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात गोंधळ उडाला आणि नागरिकांनी घाबरून पळापळ केली.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मारहाण करणाऱ्या गटातील प्रशांत चौधरी आणि हिमांशू सांखला यांना ताब्यात घेतले आहे. तसेच सुनील राठोड यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी मंगळवार, 10 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
वडिलांवरील हल्ल्याचा बदला; तरुणाकडून गावठी बंदुकीतून बेछूट गोळीबार, परिसरात भीती
0
9
3
9
9
8
Users Today : 22
Leave a comment