मेहकर –
पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळत नसल्याची तक्रार समोर येत आहे. कृषी विभागाच्या कथित हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे शेकडो शेतकरी या योजनेपासून वंचित राहत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सम्राट गजानन बोरकर आता मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नियमानुसार अर्ज करूनही त्यांना योजनेची रक्कम मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना आपली कामे करून घेण्यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. मात्र वेळेवर काम होत नसल्याने शेतकरी मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी गजानन बोरकर यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात दोन वेळा जाऊन चौकशी केली. परंतु संबंधित अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना तासन्तास कार्यालयात थांबावे लागत असल्याची तक्रारही त्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर, जर शेतकऱ्यांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण झाली नाहीत आणि योजनेचा लाभ वेळेवर मिळाला नाही, तर कोणत्याही क्षणी टॉवर आंदोलन करण्याचा इशारा गजानन बोरकर यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना दरमहा आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे. मात्र मेहकर तालुक्यातील प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
याबाबत प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन शेतकऱ्यांची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे
Users Today : 22