पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू; 1600 मीटर धावताना पुण्यात दुर्दैवी घटना

KHOZ MASTER
2 Min Read

पुणे :

पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान 1600 मीटर धावण्याच्या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरकुल येथील पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शिवाजीनगर पोलीस कवायत मैदान येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 मार्च रोजी पुण्यात पोलीस भरतीसाठी शारीरिक चाचणी सुरू होती. या प्रक्रियेतील महत्त्वाच्या 1600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत पुरुषोत्तम सहभागी झाला होता. त्याने पहिल्या दोन फेऱ्या जिद्दीने पूर्ण केल्या. मात्र तिसरी फेरी धावत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि धावत असतानाच त्याला तीव्र झटका आला. काही क्षणातच तो मैदानावरील ट्रॅकवर कोसळला.

घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि वैद्यकीय पथकाने तत्काळ त्याला प्रथमोपचार देत ससून रुग्णालय येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कुटुंबाचा आधार हरपला

पुरुषोत्तमची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाघात या आजाराने ग्रस्त असून अंथरुणाला खिळलेले आहेत. घरातील आई आणि दोन बहिणींच्या जबाबदाऱ्या पुरुषोत्तमच्या खांद्यावर होत्या.

पोलीस दलात भरती होऊन कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचे त्याचे स्वप्न होते. तो मेहनती आणि शांत स्वभावाचा तरुण म्हणून गावात ओळखला जात होता.

गावावर शोककळा

पुरुषोत्तमच्या निधनाची बातमी समजताच चिंचोली बुरकुल गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस भरतीसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र नियतीने त्याच्यावर क्रूर घाला घातल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

0 9 6 9 7 7
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *