लोणार योग महोत्सवात ७ हजारांहून अधिक साधकांचा सहभाग; एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार

KHOZ MASTER
2 Min Read

बुलढाणा

राष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योगाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या वतीने ७ एप्रिल रोजी लोणार येथे भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ७ हजारांहून अधिक योग साधक सहभागी होणार असून, एकाच वेळी त्रिकोणासन करणाऱ्या सर्वाधिक लोकांच्या सहभागाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी दिली.

बुलढाणा येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, योग ही भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन व महान परंपरा असून ती केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. योगाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार होत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला १७५ देशांचा पाठिंबा मिळाला होता. त्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला अधिकृत मान्यता मिळाली आणि २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा करण्यात आला. यंदा २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने ‘१०० दिवस योग महोत्सव-२०२६’ उपक्रम हाती घेतला आहे. या मालिकेतील दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम ७ एप्रिल रोजी जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे आयोजित करण्यात आला आहे.

या योग महोत्सवात इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, योग विद्या गुरुकुल, क्रीडा भारती, पतंजली योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हिंग, स्थानिक महिला बचत गट, शालेय विद्यार्थी तसेच आयुष विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या उपक्रमाद्वारे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

पत्रकार परिषदेस मुरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थानचे संचालक डॉ. काशिनाथ समघंडी तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. ईश्वर आचार्य उपस्थित होते.

0 9 6 9 7 7
Users Today : 21
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *