भारतामध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या Liquefied Petroleum Gas (LPG) च्या किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि मोठ्या संस्थांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आता इथेनॉलवर आधारित स्वयंपाक इंधन वापरण्याचा पर्याय तपासत असल्याची माहिती समोर आली आहे.
आखाती प्रदेशातील तणावामुळे जगभरात तेल आणि ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम भारतातील इंधन पुरवठ्यावरही होत आहे. त्यामुळे व्यावसायिक स्वयंपाकासाठी एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार पर्यायी उपाय शोधत आहे.
व्यावसायिक स्वयंपाकासाठी इथेनॉलचा विचार
अहवालानुसार, सरकार Ethanol चा वापर व्यावसायिक स्वयंपाकासाठी करण्याचा विचार करत आहे. ही योजना लागू झाल्यास हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि मोठ्या संस्थांमध्ये एलपीजी सिलेंडरचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे 1,000 कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल क्षमतेचा वापर स्वयंपाकासाठी करण्याचा प्रस्ताव आहे. येत्या काही आठवड्यांत यासंदर्भातील सविस्तर योजना तयार करून ती आंतर-मंत्रालयीन समितीसमोर सादर केली जाऊ शकते.
LPG पेक्षा इथेनॉल स्वस्त
व्यावसायिक एलपीजीची किंमत सुमारे 103 रुपये प्रति किलो आहे, तर हायड्रस इथेनॉल सुमारे 70 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होऊ शकतो. हायड्रस इथेनॉलमध्ये सुमारे 95% इथेनॉल आणि थोडे पाणी असते, त्यामुळे त्याला अतिरिक्त डीहायड्रेशन प्रक्रियेची गरज नसते आणि त्याची किंमत कमी राहते.
मात्र इथेनॉलची कॅलोरिफिक व्हॅल्यू एलपीजीपेक्षा कमी असल्यामुळे त्याचा वापर तुलनेने जास्त प्रमाणात करावा लागू शकतो.
इथेनॉल कशापासून तयार होते?
भारतामध्ये इथेनॉल प्रामुख्याने ऊस, मका आणि तांदूळ यापासून तयार केले जाते. हे एक प्रकारचे Biofuel आहे. भारतात सध्या पेट्रोलमध्येही इथेनॉलचे मिश्रण करून इंधन म्हणून वापरले जाते.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला हॉटेल, विमानतळ, कॅटरिंग युनिट्स आणि मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये स्वयंपाकासाठी इथेनॉल वापरण्याची योजना आहे. या योजनेला अंतिम मंजुरी मिळाल्यास एलपीजी सिलेंडरवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. तसेच इथेनॉल स्वस्त असल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रासह सर्वसामान्यांनाही काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
Users Today : 15