बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा आर्थिक फटका बसला असून दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. हंगामाच्या सुरुवातीला कमी भावामुळे शेतकऱ्यांनी आपला माल विकला, मात्र काही महिन्यांतच बाजारभावात मोठी वाढ झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
हंगामाच्या प्रारंभी सोयाबीनचे दर प्रति क्विंटल ४००० ते ४७०० रुपयांच्या दरम्यान होते. आर्थिक अडचणी, कर्जफेड, लग्नसराई व इतर गरजांमुळे अनेक शेतकऱ्यांनी कमी दरातच माल विक्री केली. मात्र सध्या सोयाबीनचे दर ५५०० ते ६१०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ज्या व्यापाऱ्यांनी कमी दरात मोठ्या प्रमाणात खरेदी करून साठा केला होता, त्यांना मोठा नफा मिळत आहे.
कापसाच्या दरातही अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. पूर्वी ६५०० ते ७००० रुपये प्रति क्विंटल असलेले दर आता ८००० ते ८५०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. मात्र बहुतांश शेतकऱ्यांकडील माल आधीच विकला गेल्याने त्यांना या वाढीचा कोणताही लाभ मिळालेला नाही.
पिंपळगाव येथील शेतकरी मंगेश काकडे यांनी सांगितले की, “घरातील अडचणींमुळे आम्ही ४४०० रुपयांच्या दराने ५० क्विंटल सोयाबीन विकले. आज भाव ५५०० रुपयांवर गेला आहे. जर काही दिवस थांबलो असतो तर ५० ते ६० हजार रुपयांचा अधिक फायदा झाला असता. पण शेतकऱ्यांच्या नशिबी फक्त हतबलता येते.”
बाजारपेठेतील अनिश्चितता आणि साठेबाजीमुळे दरात होणाऱ्या चढ-उताराचा सर्वाधिक फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांकडील माल संपल्यानंतरच बाजारात दरवाढ होत असल्याने हा प्रकार दरवर्षीचाच झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त करत साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच हमीभावाबाबत शासनाने ठोस धोरण राबवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही जोर धरत आहे.
Users Today : 21