सिंदखेड राजा –
सिंदखेड राजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वजनगणना’ मोहिमेचा शुभारंभ १ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौरभ तायडे आणि उपनगराध्यक्ष सौ. दिपाली योगेश म्हस्के यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शहरातील प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती संकलित करून लोकसंख्या, मूलभूत सुविधा आणि विविध गरजांचा सविस्तर आढावा घेणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या माहितीच्या आधारे भविष्यातील विकास आराखडे अधिक प्रभावीपणे राबविता येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
या मोहिमेमुळे शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून शहराच्या विकासकामांना गती मिळणार आहे. नागरिकांनी आपली माहिती अचूकपणे नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी केले.
उपनगराध्यक्ष सौ. दिपाली योगेश म्हस्के यांनीही या उपक्रमाला शहराच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले. “सहकार्य करा, नोंदणी करा” असा संदेश देत मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून ती शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून माहिती संकलित करणार आहेत. मोहिमेच्या प्रारंभी नागरिकांमध्ये उत्सुकता व सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.
उद्घाटन प्रसंगी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 21